अंबाबाई मंदिरात चाललंय काय? संवर्धन कामांवरून कोल्हापुरात नवा वाद; सकल हिंदू समाज आक्रमक
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील संवर्धन कामांवरून आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. मंदिरातील संवर्धन कामांमधील त्रुटी, मंदिरात लागलेली गळती आणि मूर्ती हलवण्याच्या प्रक्रियेबाबत आता सकल हिंदू समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संवर्धन कामात होत असलेल्या निष्काळजीपणाच्या विरोधात मंगळवारी सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणावर तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती.

आज थेट सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी अंबाबाई मंदिरात जाऊन सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मंदिराची दुरवस्था आणि कामातील त्रुटी पाहून कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मंदिराच्या पवित्रतेला धक्का पोहोचेल असं काम खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या पाहणी दौऱ्यावेळी गजानन तोडकर, अभिजीत पाटील यांच्यासह सकल हिंदू समाजाचे अनेक प्रमुख प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या वादावर प्रशासन काय पावलं उचलणार आणि संवर्धन कामातील त्रुटी कशा दूर केल्या जाणार, याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.




