आ. शिवाजी पाटील यांचा गैरसमज झालेला दिसतोय - मंत्री मुश्रीफांनी दिलं स्पष्टीकरण

आ. शिवाजी पाटील यांचा गैरसमज झालेला दिसतोय -  मंत्री मुश्रीफांनी दिलं स्पष्टीकरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) - चंदगड नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही राजर्षी शाहू आघाडी निर्माण केली होती. ही आघाडी निर्माण करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे माजी आ. राजेश पाटील आणि कै. बाबासाहेब कुपेकरसाहेब यांच्या कन्या डाॅ. नंदाताई बाभुळकर यांच्यामध्ये चर्चा झालेल्या होत्या. माझी भूमिका त्यांना आशीर्वाद देण्याची आणि "मम...." म्हणण्याची होती. परंतु; आ.शिवाजी पाटील यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. त्यांनी माझ्याशी दोनवेळा चर्चा केली होती. परंतु; या दोन्हीही चर्चेत त्यांनी त्यांची आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांची चर्चा होऊन त्यांची आघाडी झालेली आहे, असं कधीही सांगितलेलं नव्हतं. त्यांनी ते लपवून ठेवलेलं होतं. आमदार पाटील यांनी गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज तालुक्यातील उर्वरित जिल्हा परिषद मतदार संघांबाबत माझ्याशी चर्चा केलेली होती. त्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामधील भावना व्यक्त केलेल्या होत्या. याच्या पलीकडे त्यांचे आणि माझे कोणतेही बोलणे झालेले नव्हते असे स्पष्टीकरण मंत्री मुश्रीफांनी दिले.

        

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, माजी आ. राजेश पाटील आणि डाॅ. नंदाताई बाबुळकर यांनी चर्चा करून निर्णय घेतला होता. माजी आ. राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे तिथले नेते आणि माजी आमदार आहेत. त्यांची तक्रार होती की आमच्याशी अद्याप कुणीही चर्चा केलेली नाही. तसेच; मी जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता असल्यामुळे माझा पक्ष एकाकी पडू नये म्हणून आम्ही ही भूमिका घेतली. निवडणुकांमध्ये ज्यावेळी अशा युत्या होतात त्यावेळी आघाडीच करायची असल्यामुळे दोन्हीही चिन्हे न वापरता आघाडी करण्याचा सल्ला मी त्यांना दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी ती युती केली आणि काल आशीर्वाद देण्यासाठी मी उपस्थित होतो. या सगळ्या परिस्थितीत आ. शिवाजी पाटील यांनी गैरसमज करून घेतलेला दिसतोय. त्यांनी तो गैरसमज मनातून काढून टाकावा असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले. 

आ. शिवाजी पाटील यांच्या फोनमुळेच मला कळालं......!

मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे, आ. शिवाजी पाटील आणि डॉ. नंदाताई बाबुळकर यांची चर्चा होऊन आघाडी झालेली आहे, असे आमदार  पाटील यांनी मला कधीही सांगितलेले नव्हते. आ. पाटील यांचा काल मला अचानक फोन आला की, त्यांची आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांची आघाडी झालेली होती. तुमच्यामुळे ती मोडली. त्यावेळीच मला कळालं की त्यांची ही आघाडी पूर्वी झाली होती. परंतु; हे त्यांनी मला असं कधीही सांगितलेले नव्हते. त्यांनी ते माझ्यापासून लपवून ठेवलेले होते.