इंदुरीकर महाराजांचा भावनिक निर्णय : मुलीवरील टीकेमुळे कीर्तन सोडण्याची केली घोषणा

इंदुरीकर महाराजांचा भावनिक निर्णय : मुलीवरील टीकेमुळे कीर्तन सोडण्याची केली घोषणा

मुंबई - महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर झालेल्या वैयक्तिक टीकांमुळे इंदुरीकर महाराज अत्यंत व्यथित झाले आहेत. या टीकेमुळे त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं असून, त्याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये महाराज म्हणतात, “माझी मुलं लहान असताना मी कीर्तनासाठी फिरत होतो. आठ-आठ दिवस त्यांच्याशी भेट व्हायची नाही. पण आता लोक इतके खालच्या पातळीवर गेलेत की माझ्या मुलीच्या कपड्यांवरून कमेंट्स करत आहेत. चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यांवर लोक बातम्या तयार करत आहेत. तिचा बाप म्हणून मला हे असह्य झालं आहे. माझ्या मुला - मुलीचा काय दोष आहे?”

पुढे ते म्हणाले, “या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल केलं आहे. तुमच्याही मुली असतील, त्यांच्या कपड्यांवर कोणी बोललं तर काय वाटेल? साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतले जातात की मुलीकडचे? एवढंही समजत नाही का लोकांना? अशी क्लिप टाकणाऱ्यांनी तरी लाज वाटली पाहिजे.”

इंदुरीकर महाराजांनी भावनिक शब्दांत पुढे सांगितलं, ३१ वर्ष लोकांसाठी कीर्तन केलं, टीका सहन केली, पण घरादारावर आली ते सहन होत नाही. आता मी दोन - तीन दिवसात एक निर्णय घेणार आहे. कदाचित कीर्तनं बंदच करेन. आता मजा राहिली नाही. या वक्तव्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि समाजमाध्यमांवर त्यांच्या समर्थनार्थ मोठी प्रतिक्रिया उमटली आहे. अनेकांनी महाराजांना निर्णय मागे घ्यावा आणि समाजासाठी कार्य सुरू ठेवावं, अशी विनंती केली आहे.

https://www.instagram.com/reel/DQ9hEhWjKm6/?utm_source=ig_web_copy_link