घरात बसून कॉमेंट करणे सोपे आहे; हिम्मत असेल तर रस्त्यावर या - बच्चू कडू

घरात बसून कॉमेंट करणे सोपे आहे; हिम्मत असेल तर रस्त्यावर या - बच्चू कडू

नागपूर - नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी झालेल्या महाएल्गार आंदोलनानंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्यावर झालेल्या मॅनेज झाले या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. बच्चू कडू म्हणाले, घरात बसून कॉमेंट करणे सोपे आहे. हिम्मत असेल तर मी मॅनेज झालो असे म्हणणाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी लढावे. मी एकट्याने शेतकऱ्यांसाठी लढण्याचा ठेका घेतलेला नाही. तुम्हीही लढा, सरकारकडून आणखी जवळची तारीख मिळवून द्या; थेट पैसे आणलात तरी आमची काही हरकत नाही.

सरकारने शेतकऱ्यांच्या २२ मागण्यांपैकी मुख्य मागणी कर्जमाफी यावर सकारात्मक भूमिका घेतली असून, गुरुवारी रात्री उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शासन निर्णयानुसार, ३० जून २०२६ पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होईल, असं जाहीर करण्यात आलं आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर बच्चू कडू, महादेव जानकर आणि वामनराव चटप यांचे नागपूरजवळील खापरी पुनर्वसन क्षेत्रातील समाज भवन येथे आंदोलक शेतकऱ्यांनी उत्साहात स्वागत केलं.

बच्चू कडू पुढे म्हणाले, जे सरकार कर्जमुक्ती हा शब्दही उच्चारत नव्हते, त्यांनी आज या आंदोलनामुळे कर्जमाफीची निश्चित तारीख जाहीर केली. हे आंदोलनाचं मोठं यश आहे. अडीच तासांच्या चर्चेत आम्ही तारीख सांगितल्याशिवाय उठणार नाही, हा निर्धार केला आणि अखेर सरकारने मान्य केलं. आम्ही कुणाचेही वैरी नाही. जो शेतकऱ्यांचा वैरी, तो आमचा वैरी. सरकारने दिलेली तारीख पाळली पाहिजे. जर कुठला दगा-फटका झाला, तर ३० जून २०२६ नंतर आरपारचं, अगदी रक्तरंजित आंदोलनही पुकारलं जाईल. कर्जमाफीसह उर्वरित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठ दिवसांत पुन्हा एक बैठक घेण्यात येणार आहे. आंदोलन टप्प्याटप्प्याने पुढे नेण्याची रणनीती ठरविण्यात येईल, असं कडू यांनी सांगितलं.

वामनराव चटप यांनीही आंदोलनाच्या यशाबद्दल बोलताना म्हटलं, जात-धर्म न पाहता शेतकऱ्यांना एकत्र आणणं कठीण आहे, पण हे आंदोलन त्या मर्यादा ओलांडून शेतकऱ्यांना एकत्र आणू शकलं आहे. आतापर्यंत कर्जात जगलो, पण कर्जात मरायचं नाही. सात-बारा कोरा झाल्याशिवाय हार मानायची नाही.