"पर्यटकांनो सावधान! कोल्हापूरच्या धबधब्यांवर जाण्यापूर्वी वन विभागाची 'ही' नियमावली नक्की वाचा!"
कोल्हापूर/प्रतिनिधी : पावसाळा सुरू झाला की कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याला बहर येतो. भुदरगडचा सवतकडा, शाहूवाडीचा बर्की धबधबा, आजऱ्याचे रामतीर्थ, चंदगडमधील तिलारी परिसरातील धबधबे आणि पन्हाळ्याचे मसाई पठार या ठिकाणी सध्या पर्यटकांची भारी गर्दी होतेय. पण, आनंद घेताना सुरक्षितता विसरून चालणार नाही! याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी पर्यटकांसाठी एक महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे.

वन विभागाने पर्यटकांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पुढील गोष्टी पाळण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे नियमावली :
- खोल पाण्यात उतरू नका: धबधब्यांच्या खोल पाण्यात जाणे किंवा निसरड्या कड्यांवर, दगडांवर चढ-उतार करणे पूर्णपणे टाळा.
- सेल्फीचा मोह आवरा: धोकादायक कडांवर जाऊन सेल्फी काढू नका, तो जीवावर बेतू शकतो.
- मद्यपानास सक्त मनाई: मद्यपान करून पर्यटनस्थळी येणे किंवा पाण्यात उतरणे कायदेशीर गुन्हा आहे.
- कचरा करू नका: निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी प्लास्टिक, काचेच्या बाटल्या किंवा कोणताही कचरा परिसरात टाकू नये. तसेच मोठ्या आवाजात संगीत वाजवून वन्यजीवांना त्रास देऊ नका.
अतिवृष्टी किंवा अचानक पाण्याची पातळी वाढल्यास धबधब्यांच्या परिसरात जाऊ नका. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी वन विभागाचा टोल-फ्री क्रमांक १९२६ वर तात्काळ संपर्क साधा.
तसेच, तुम्ही संबंधित तालुक्यांच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशीही संपर्क साधू शकता:
- गारगोटी: अविनाश तायनाक - 9422701221
- शाहुवाडी: किशोर आहेर - 8652496253
- आजरा: सचिन सावंत - 9049501314
- चंदगड: शीतल पाटील - 9422974038
- पन्हाळा: अजित माळी - 9405291523
पर्यटनाचा आनंद नक्की घ्या, पण जबाबदार नागरिक म्हणून वन विभाग आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करा. तुमचा एक सुरक्षित निर्णय, तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आनंद टिकवून ठेवेल!




