पार्थ पवारांना बोलण्याची कुणाची हिंमत ; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रंगसफेदी करू नये - खा. संजय राऊत

पार्थ पवारांना बोलण्याची कुणाची हिंमत ; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रंगसफेदी करू नये - खा. संजय राऊत

मुंबई -  पार्थ पवार यांचे पिताश्री राज्याच्या राजकारणात मोठे वजनदार व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे एखाद्या कामाचा प्रस्ताव घेऊन ते पुढे आले, तर त्यांना बोलण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही, असा टोला लगावत मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रंगसफेदी करू नये, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसेच, आम्ही वडेट्टीवार यांना फारसे महत्त्व देत नाही. काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी स्वतंत्र विदर्भ होणार नाही, असे स्पष्ट करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र असल्याचेही त्यांनी सांगितले.

खा. संजय राऊत पुढे म्हणाले की, सध्या विधिमंडळाची सर्कस सुरू असून दशावतार पाहायला मिळत आहेत. कामकाजातील गांभीर्य पूर्णपणे संपले आहे. सत्ताधारी पक्ष विरोधकांना घाबरत असून त्यांच्या चुका उघड होऊ नयेत, म्हणूनच महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड केली जात नाही. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेता नसणे ही सत्ताधाऱ्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. विरोधी पक्षांच्या भीतीपोटीच ही निवड होऊ दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकशाहीचे संकेत पाळत नसल्याचा आरोप करत खा. राऊत म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे भाजपची धिंडवडे निघत आहेत. त्यामुळेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आणि विशेषतः मंत्री अमित शहांना सगळे घाबरत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राच्या लढ्यात उद्योगपती गौतम अदाणी नव्हते आणि मुंबईच्या लढ्यात भाजप कुठेच दिसला नव्हता, असे सांगत सध्या महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांकडून कसा ओरबाडला जात आहे, यावर चर्चा व्हायला हवी, असे मतही खा. राऊतांनी व्यक्त करत महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतंत्र विदर्भाचे काम सुरू असल्याचे विधान केले. मात्र, यावर मिंधे गटातील एकही मंत्री बोलला नाही. यावरून सत्ताधारी मंत्री अमित शहांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत खा. संजय राऊत यांनी पालघरमध्ये गुजरातचा पूर्णपणे शिरकाव झाला असल्याचा दावा केला. पालघर जिल्ह्याच्या सीमा उल्लंघन करून गुजरातने प्रवेश केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.