पीक विमा भरपाईवरून तानाजी सावंत आक्रमक; तहसीलदारांना फोनवरच सुनावलं

पीक विमा भरपाईवरून तानाजी सावंत आक्रमक; तहसीलदारांना फोनवरच सुनावलं

मुंबई (प्रतिनिधी) : खरीप पीक विमा 2025 च्या भरपाईतील तफावतीवरून आमदार तानाजी सावंत यांनी वाशीच्या तहसीलदारांना थेट फोन करून तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

फोनवरील संभाषणात तानाजी सावंत म्हणाले, लोकांचे संसार जळायला लागलेत आणि तुम्ही म्हणता बघून घेतो. म्हणजे काय? तुम्ही संवेदनशील नाही का?त्यांच्या या संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यावेळी त्यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तातडीने बैठक घेऊन भरपाईतील तफावत दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जास्तीत जास्त भरपाई मिळावी, असे निर्देशही दिले.

दरम्यान, शेजारच्या तालुक्यांमध्ये प्रति हेक्टर सुमारे 20 हजार रुपयांपर्यंत विमा मंजूर झाला असताना, भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील अनेक महसुली मंडळांमध्ये केवळ 900 ते 3,500 रुपयांपर्यंतच भरपाई जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यभरात पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 9 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला नाही. विशेषतः मराठवाड्यात ही घट अधिक असून, पीक विमा योजनेतील काही जोखीम निकष वगळल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.