शिक्षक बँक सभासदांना ९ टक्के व्याजाने ५० लाखांपर्यंत कर्ज - शिवाजी रोडे - पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) - प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभासदांना पगार तारणावर अवघ्या ९ टक्के व्याजदराने ५० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी रोडे - पाटील यांनी दिली. तसेच, ज्या सभासदांचा पगार बँकेत जमा होतो अशा सभासदांना ८ लाखांपर्यंतचे क्लिन कॅश क्रेडिट कर्जही मंजूर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने राव डी. आर. भोसले यांनी या बँकेची स्थापना केली होती. संस्थापकांच्या विचारांनुसार संचालक मंडळ कार्यरत असून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहास ‘राव डी. आर. भोसले सभागृह’ असे नामकरण करण्यात आल्याचे अध्यक्ष रोडे - पाटील यांनी नमूद केले.
अत्यल्प व्याजदराचे शासकीय कर्जरोखे, कमी दराने करावी लागणारी गुंतवणूक, जुन्या थकबाकीपोटी करावी लागणारी एनपीए तरतूद, तसेच सेवानिवृत्ती व जिल्हा बदल्यांमुळे घटणारी सभासद संख्या या सर्व अडचणींवर मात करत बँकेने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दीड टक्के मार्जिनवर बँकेचे कामकाज सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी ‘उत्कर्ष कर्ज’ योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत कर्जाचा व्याजदर ९ टक्के राहणार आहे.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष सुरेश कोळी यांच्यासह संचालक मंडळातील बाळासाहेब निंबाळकर, अर्जुन पाटील, सुनील एडके, राजेंद्रकुमार पाटील, बाळकृष्ण हळदकर, एस. व्ही. पाटील, शिवाजी बोलके, रामदास झेंडे, बाबू परीट, नंदकुमार वाईगडे, अमर वरुटे, गजानन कांबळे, गौतम वर्धन, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, अमोल पाटील, बाबूराव कांबळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम व सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.




