आंदोलनावर सरकारशी चर्चा सुरू; जेपी नड्डांसमोर सीजेपीच्या तीन मागण्या, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सस्पेन्स

आंदोलनावर सरकारशी चर्चा सुरू; जेपी नड्डांसमोर सीजेपीच्या तीन मागण्या, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सस्पेन्स

मुंबई (प्रतिनिधी) : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन आंदोलनाशी संबंधित प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सरकारने काही मागण्या मान्य केल्याचे सांगत आपले उपोषण मागे घेतले. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बैठकीनंतर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले की, पक्षाने सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि 20 जुलै रोजी संसद परिसरातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

सौरव दास यांच्या म्हणण्यानुसार, सरकार दोन मागण्यांबाबत सकारात्मक असून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजेपर्यंतचा वेळ मागण्यात आला आहे.

दरम्यान, जंतर-मंतर आणि संसद परिसरातील आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि मारहाणीबाबतही सीजेपीने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी आणि जखमी तसेच बाधित विद्यार्थ्यांना योग्य मदत मिळावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.

दरम्यान, सोनम वांगचुक यांनीही व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत, ही आपली सर्वात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तरी आंदोलनाची भूमिका कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.