ईश्वरपूरचा रस्ता नाही, अन् मिसिंग लिंकवर भाषण; पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पातील बोगद्यात दरड कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी सरकारच्या पायाभूत सुविधा आणि नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी हजारो कोटींच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पात पहिल्याच पावसात दरड कोसळल्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रकल्पाचे हवामान बदलाच्या दृष्टीने 'क्लायमेट ऑडिट' झाले होते का, तसेच भौगोलिक जोखमींचा पुरेसा अभ्यास करण्यात आला होता का, असा सवाल त्यांनी सरकारला केला.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. "ज्यांना 40 वर्षांत सांगली-ईश्वरपूरचा रस्ता करता आला नाही, ते आज मिसिंग लिंकवर बोलत आहेत," अशी टीका त्यांनी केली. तसेच बारामती-फलटण मार्गाचे उदाहरण देत, महायुती सरकारच्या काळात अनेक महत्त्वाचे रस्ते पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी पडळकर यांनी मुंबई-पुणे घाटमार्गाशी संबंधित एक ऐतिहासिक संदर्भही मांडला. 'वीर शिंग्रोबा धनगर' यांच्या नावाने मिसिंग लिंक प्रकल्पाला नाव देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.




