ओमराजेंच्या निर्णयाआधीच तुळजापुरात बॅनरबाजी; धाराशिवच्या राजकारणात खळबळ
मुंबई (प्रतिनिधी) : धाराशिवच्या राजकारणात सध्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्यापूर्वीच तुळजापुरात त्यांच्या स्वागताचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. "वाघ चालला वाघाच्या कळपात!" असा मजकूर असलेल्या या बॅनरमुळे ओमराजे निंबाळकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार का, याबाबतच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.दरम्यान, एका मुलाखतीत ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना त्यांनी आदित्य ठाकरे अधिक सक्रिय असायला हवे होते, असे मत मांडले.
पक्षांतराच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ओमराजे म्हणाले की, आपण सध्या मोठ्या धर्मसंकटात आहोत. भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही बाजूंनी विचार सुरू असून कार्यकर्त्यांचा दबावही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालानंतर आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.ओमराजेंच्या निर्णयाकडे आता धाराशिवसह राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.




