पुढील सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम नाहीत; बुलेटवरून विधानभवनात पोहोचलेल्या फडणवीसांचा विरोधकांना इशारा

पुढील सहा महिने मोठे शासकीय कार्यक्रम नाहीत; बुलेटवरून विधानभवनात पोहोचलेल्या फडणवीसांचा विरोधकांना इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वांनाच चकित केले. मुख्यमंत्री फडणवीस चक्क 'रॉयल एनफिल्ड 350' या दुचाकीवरून विधान भवनात दाखल झाले. त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण सुरक्षा ताफादेखील दुचाकीवरच होता. इंधन बचत आणि साधेपणाचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उचललेल्या या पावलाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, "पंतप्रधानांनी जे काही निर्देश दिले आहेत ते देशहिताकरिता आहेत. त्यामुळे आपापल्या परीने जे जे करता येईल त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. राज्यातले नेते मंडळी जेव्हा अशा प्रकारे प्रचार करतात, ते लोकांपर्यंत पोहोचते म्हणून मी आज मोटार सायकलने आलेलो आहे. आमचा ताफा देखील कमी केलेला आहे.सर्वांचा परदेशातील प्रवास देखील आम्ही रद्द केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कसे करता येईल, तसेच परकीय चलन बचत कशी करता येईल? हा आमचा प्रयत्न असेल."

ते पुढे म्हणाले, " उद्या साताऱ्याला एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचं आधीच नियोजन झालेले असल्याने आणि त्यावर आधीच पैसा खर्च झालेला असल्याने तो कार्यक्रम आम्ही रद्द केलेला नाही. पण, यानंतर पुढील सहा महिने आम्ही शासनाच्या वतीने कुठल्याही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणार नाही," अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.