'कोणी कितीही नाही म्हटले तरी माझी माहिती पक्की'; देवेंद्र फडणवीसांबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
मुंबई:दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या या खात्याचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला असला, तरी केंद्र सरकार एका उत्तम नेतृत्वाच्या शोधात आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच देशाचे नवे केंद्रीय शिक्षणमंत्री (मनुष्यबळ विकास मंत्री) होतील, असा अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

"पंतप्रधान मोदी अन् फडणवीसांमध्ये झालीये चर्चा"
रविवार, २ ऑगस्ट रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांवर भाष्य केले. राऊत म्हणाले, "पंतप्रधान मोदींना गेल्या १२ वर्षांत पहिल्यांदाच एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. तरुणांनी आंदोलन करून मोदींना माघार घेण्यास भाग पाडले. आता या शिक्षण खात्यासाठी दूरदृष्टी असलेला उच्चशिक्षित प्रशासक हवा असून देशात देवेंद्र फडणवीस हेच उत्तम शिक्षणमंत्री होऊ शकतात, हे पंतप्रधान मोदींनाही ठाऊक आहे."
दिल्लीतून मिळालेल्या माहितीचा हवाला देत राऊत पुढे म्हणाले, "पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी स्वीकारण्याबाबत चर्चा झाली आहे. कोणी कितीही नकार दिला किंवा नाही म्हटले, तरी ही माझी माहिती एकदम पक्की आहे."
"महाराष्ट्रात फडणवीसांच्या पसंतीचाच मुख्यमंत्री होईल"
फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण? यावर बोलताना राऊत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, "भाजपमध्ये दिल्लीतून राज्यावर राज्य करण्याची परंपरा आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशात त्यांनी ज्यांना मुख्यमंत्री केले त्यांची नावेही लोकांना माहीत नाहीत. भाजप अशाच लोकांना पदावर बसवतो जे कमी कार्यक्षम आणि अलोकप्रिय असतात. मात्र, फडणवीस केंद्रात गेले तरी महाराष्ट्रात त्यांच्याच पसंतीचा मुख्यमंत्री बसवला जाईल," असेही राऊतांनी नमूद केले.
शेवटी बोलताना, "या देशाला एक उत्तम आणि सक्षम शिक्षणमंत्री मिळो, हीच आमची इच्छा आहे," असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.




