कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा झाला प्रवाहित; विहंगम दृश्य पाहण्यासाठी गर्दी!
कोल्हापूर/ प्रतिनिधी : पावसाळी पर्यटनाची आणि निसर्गाचा आनंद घेण्याची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि पर्यटकांचा आवडता राऊतवाडी धबधबा अखेर प्रवाहित झाला आहे.

पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या राधानगरी तालुक्यातील हा धबधबा दरवर्षी वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू असतो. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचा जोर वाढल्यामुळे हा धबधबा आता कोसळू लागला आहे.
धबधब्याचे थंडगार तुषार अंगावर झेलत वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो पर्यटक येथे दाखल होऊ लागले आहेत. विकेंडला तर या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जर तुम्हीही या पावसाळ्यात निसर्गाचा सुंदर नजारा पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर राधानगरीचा हा राऊतवाडी धबधबा तुमच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. मात्र, पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेचे नियम पाळायला विसरू नका!




