कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा !
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूरकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या गौरवशाली परंपरेला आणखी एक मान्यता मिळाली असून, येथील शाही दसरा सोहळ्याला महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले असून, २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात राज्य सरकारतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मैसूरच्या शाही दसऱ्याच्या धर्तीवर कोल्हापूरचा दसरा देखील संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. इतिहासाच्या पानांत कोल्हापूरचा शाही दसरा हा समृद्ध परंपरांचा आणि राजेशाही थाटाचा उत्सव मानला जातो. संस्थान काळात जेवढ्या उत्साहात हा सोहळा साजरा व्हायचा, तोच उत्साह आजही परंपरेतून टिकून आहे.
पूर्वी टेंबलाईवाडीच्या माळावर पारंपरिक "सोने लुटणे" सोहळा साजरा केला जायचा. कालांतराने तो दसरा चौकात हलवण्यात आला. या सोहळ्यात जुना राजवाडा ते दसरा चौक असा छबिनाचा मिरवणुकीचा मार्ग ठरलेला असून, त्यात शाही लवाजमा, पारंपरिक वाद्यवृंद, आणि करवीरकरांची प्रचंड गर्दी हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.
दसरा चौक, जो आज शहराच्या मध्यवर्ती भागात आहे, तो राजर्षी शाहू महाराजांच्या काळात शहराबाहेरचा मोकळा माळ होता. त्या काळात चौकाभोवती फक्त काही निवासस्थाने आणि मठ होते. भवानी मंडपापासून निघणारा छबिना, आणि त्याला मिळणारा जनतेचा प्रतिसाद ही दृश्ये आजही कोल्हापूरकरांच्या आठवणींमध्ये जिवंत आहेत.
आजही शाही दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दसरा चौकात जोरदार तयारी केली जाते. लाल-पांढऱ्या रंगातील शामियाना उभारले जातात, करवीर संस्थानाचा जरीपटका चौकात फडकतो. दगडी कमानी, पानांची सजावट, आणि पारंपरिक ध्वज हे सर्व वातावरणाला उत्सवी रंग देतात. सोने लुटण्याचा खास लाकडी लगडकोट तयार केला जातो आणि त्यामध्ये आपट्याची पाने गच्च भरली जातात. दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण चौक सीमोल्लंघनासाठी सज्ज असतो.
कोल्हापूरचा हा शाही दसरा केवळ एक धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव नसून, परंपरेचा आणि अस्मितेचा भव्य सोहळा आहे. जो आता अधिकृतपणे राज्य महोत्सवाच्या मानांकनाने सन्मानित झाला आहे.




