टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी उद्योगांनी CSR च्या माध्यमातून पुढाकार घ्यावा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन
मुंबई:‘टीबीमुक्त महाराष्ट्र’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी शासन आणि उद्योग क्षेत्रांनी हातात हात घालून ‘मिशन मोड’वर काम करणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योगांनी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या (CSR) माध्यमातून या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

मुंबईतील ‘ताज प्रेसिडेंट’ येथे आयोजित ‘टीबीमुक्त भारत - कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद २०२६’ अंतर्गत धोरणात्मक कॉर्पोरेट भागीदारीद्वारे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ते बोलत होते.
शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राची एकत्र येण्याची गरज
कार्यक्रमात बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र आल्यास राज्यातील सार्वजनिक आरोग्याचे अपेक्षित उद्दिष्ट सहज साध्य करता येईल आणि त्यासाठी ‘सीएसआर’ हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठरू शकतो.
नागरिकांमधील भीती दूर करणे आवश्यक
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य मोहिमा सातत्याने राबवल्या जातात. मात्र, तपासणी आणि उपचारांविषयीची भीती तसेच आजारामुळे स्वतःला व कुटुंबाला होणाऱ्या त्रासाच्या चिंतेपोटी अनेक नागरिक तपासणीसाठी पुढे येत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून जनजागृती करणे गरजेचे आहे.
विशेषतः शहरांमध्ये टीबीबाबत अजूनही अपेक्षित जनजागृती झालेली नाही. आजाराचे निदान उशिरा होण्यापेक्षा नागरिकांना वेळेत तपासणीसाठी प्रवृत्त करणे आवश्यक असून यासाठी उद्योगांचे योगदान मोलाचे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘मिशन मोड’वर काम करण्याचा अनुभव उपयुक्त ठरतील
यापूर्वी केवळ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. परंतु आता या कामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. पोलिओ, कोरोना आणि एड्सविरोधातील लढा यशस्वी ठरण्यामागे 'मिशन मोड'वर केलेले काम कारणीभूत होते. त्याच धर्तीवर टीबीविरोधातही लक्ष्यित तपासणी (Targeted Screening) आणि आवश्यक उपाययोजनांवर भर दिल्यास महाराष्ट्राच्या आरोग्य सुरक्षेसाठी हे मैलाचा दगड ठरेल.
टीबीमुक्त महाराष्ट्राच्या या प्रवासात शासन आणि उद्योगांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची सुरुवात या कार्यक्रमातून करावी, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.




