FDA ची मोठी कारवाई: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात डॉमिनोज, KFC, McD सह प्रमुख फूड चेनवर छापे; ५ जणांचे परवाने निलंबित

FDA ची मोठी कारवाई: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात डॉमिनोज, KFC, McD सह प्रमुख फूड चेनवर छापे; ५ जणांचे परवाने निलंबित

मुंबई: राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध’ या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न आणि औषध व्यवसायांवर राज्यभरात मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट नेतृत्वात ही मोहीम राबवली जात असून राज्यातील अनेक नामांकित हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांशी संबंधित आस्थापनांवर कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध भागांतील एकूण १०४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने २ व्यवसाय तात्काळ बंद करण्यात आले, ९५ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर ५ आस्थापनांचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत.

बड्या फूड चेन्सवर FDA ची करडी नजर

या मोहिमेदरम्यान केवळ स्थानिक हॉटेल्सच नव्हे, तर जगप्रसिद्ध साखळी आस्थापनांचीही कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने डॉमिनोज पिझ्झा, केएफसी (KFC), पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड (McDonald's), सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मॉंजिनिज या प्रमुख ब्रँड्सचा समावेश आहे.


डॉमिनोज पिझ्झाला मोठा दणका: ४ शाखांचे परवाने निलंबित

तपासणीदरम्यान स्वच्छता आणि अन्न साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर FDA ने डॉमिनोज पिझ्झाच्या ४ शाखांचा परवाना निलंबित केला आहे.

कारवाई झालेली ठिकाणे: मुंबईतील विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील ‘आर सिटी मॉल’मधील डॉमिनोजच्या शाखांवर ही कारवाई करण्यात आली. याशिवाय सातारा जिल्ह्यातील डॉमिनोजच्या एका शाखेचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे.

कारवाईची तारीख व शहरे: १० आणि ११ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरांमध्ये हे छापे टाकण्यात आले.

तपासणीत काय त्रुटी आढळल्या?

FDA च्या पथकाला तपासणी दरम्यान खालील गंभीर बाबी निदर्शनास आल्या:


अपुरी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचा अभाव

कीटक नियंत्रणातील (Pest Control) ढिसाळपणा

अन्नाची अयोग्य साठवणूक आणि आवश्यक तापमानावर देखरेख नसणे

कच्चा माल आणि तयार अन्न एकत्र ठेवणे (विलगीकरणाचा अभाव)

अन्नसुरक्षेविषयक आवश्यक नोंदी अपूर्ण असणे

 ही संपूर्ण कारवाई 'अन्नसुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायांचे परवाने आणि नोंदणी) नियमन, २०११' (Food Safety and Standards Regulations, 2011) अंतर्गत करण्यात आल्याची माहिती FDA प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दूध भेसळीवरही कारवाई

याच विशेष तपासणी मोहिमेचा भाग म्हणून राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचीही तपासणी करण्यात आली. त्यात भेसळ आढळल्याने संबंधित ठिकाणी FDA कडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न व औषधे मिळावीत यासाठी ही मोहीम यापुढेही तीव्र केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.