ठाकरेंना मोठा धक्का! ६ खासदार शिंदेंच्या वाटेवर; दिल्लीत वाढणार एकनाथ शिंदेंचं राजकीय वजन
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील ६ खासदारांनी पक्षाच्या संसदीय बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या खासदारांनी पुढील काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास केंद्रातील सत्तासमीकरणांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएला २९३ खासदारांचा पाठिंबा मिळाला होता. आता विविध राजकीय घडामोडींमुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात ठाकरे गटातील ६ खासदार शिंदे गटात दाखल झाल्यास एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची लोकसभेतील ताकद ७ वरून १३ खासदारांपर्यंत जाऊ शकते.२०२२ मध्ये शिवसेनेत बंड करत भाजपासोबत सत्ता स्थापन करणारे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नेतृत्व बदलले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तरीही शिंदे यांनी आपली राजकीय ताकद कायम राखली आहे.
लोकसभेत भाजपकडे २४० खासदार आहेत. त्यानंतर एनडीएतील इतर घटक पक्षांची संख्या आहे. शिंदे गटाची खासदारसंख्या १३ वर पोहोचल्यास ते आघाडीतील प्रभावशाली पक्षांपैकी एक ठरू शकतात. त्यामुळे दिल्लीतील सत्ताकेंद्रांमध्येही एकनाथ शिंदे यांचे महत्त्व वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोर नवीन आव्हाने उभी राहू शकतात. तसेच महाराष्ट्रातील महायुतीच्या राजकारणातही नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदेंच्या या संभाव्य राजकीय खेळीमुळे राज्यासह दिल्लीतील राजकारणावर सर्वांचे लक्ष लागले आहे.




