तपोवनातील वृक्षतोडीवरून वाद चिघळला; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध
मुंबई - नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात साधूंसाठी साधुग्राम उभारण्याची योजना आखण्यात येत असून, त्यासाठी तपोवन परिसरातील 1500 हून अधिक झाडांची तोड प्रस्तावित आहे. पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही वृक्षतोडीविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. दुसरीकडे कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी मात्र वृक्षतोडीचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मध्यममार्ग काढण्याची तयारी दाखवली असली तरी महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरळ विरोधाची भूमिका घेतली असून सयाजी शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

एकीकडे साधुग्रामासाठी झाडे तोडण्याचा निर्णय घेतला जात असतानाच, नाशिक महानगरपालिकेने याच जागेवर पीपीपी पद्धतीने प्रदर्शन केंद्र, बॅन्क्वेट हॉल आणि रेस्टॉरंट उभारण्यासाठी तब्बल 220 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. यामुळे तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा अधिकच तापला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावरून आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे, तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचाराने तोडगा काढला पाहिजे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरणहिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण वाचले तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सरकारच्या भूमिकेला विरोध दर्शवल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेदही उघड झाले आहेत. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकांमध्ये तपोवनातील वृक्षतोड हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.




