दुष्काळी आढावा बैठकीत आमदाराचा जेवणावर ताव; महायुती सरकारवर काँग्रेस आक्रमक, शिवराज मोरेंचा व्हिडिओ ट्विट करत संताप
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. अशा गंभीर परिस्थितीत राज्यभरातून दुष्काळ जाहीर करण्याची आणि विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी होत आहे. मात्र, दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकांमध्ये सत्ताधारी नेते आणि अधिकारी जाबसाल सोडून खाण्यापिण्यात मग्न असल्याचे समोर येत आहे. यावरून आता विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आमदाराचा जेवणावार ताव मारतानाचा व्हिडिओ व्हायरल
यापूर्वी नांदेडमधील आढावा बैठकीत नेते व मंत्री काजू-बदाम खाताना दिसल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती, तर अकोल्यातील बैठकीत अधिकारी सोशल मीडियावर व्यस्त असल्याचे समोर आले होते. आता महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी एक नवीन व्हिडिओ ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. दुष्काळाने बळीराजा होरपळत असताना आणि पीक जळून खाक झाले असताना, सत्ताधारी आमदार नारायण कुचे हे मात्र दुष्काळ निवारणाच्या बैठकीत आरामात जेवणावर ताव मारत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिवराज मोरेंचे सरकारवर ताशेरे
कधी काजू-बदाम, तर कधी शाही जेवण... महायुती सरकारने बळीराजाची ही चेष्टा तात्काळ थांबवावी," असे म्हणत शिवराज मोरे यांनी सरकारच्या असंवेदनशील कारभारावर टीका केली आहे. तसेच, सत्ताधाऱ्यांच्या अशा वर्तणुकीमुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात असून, सरकारने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.




