नवऱ्यामुळे रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य संपवलं? पोलिसांकडून गुन्हा दाखल
मुंबई (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्येनंतर तब्बल 25 दिवसांनी रोहिणीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय.रोहिणी पाराध्ये हिनं आपल्या हॉटेल ग्रामपंचायत या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर रोहिणीच्या आत्महत्येचं कारण शोधलं जात होतं.याबाबत पोलिसांनी सीडीआर तपास देखील केला. मात्र, या प्रकरणात कुठलेच धागेदोरे हाती लागले नाहीत. आता पोलिसांनी रोहिणीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या 25 वर्षांच्या विवाहित रिल स्टार रोहिणी पाराध्ये मंगळवेढा तालुक्यात आपल्या पतीसोबत 'हॉटेल ग्रामपंचायत' चालवायची.रोहिणी निलेश पाराध्ये सोशल मीडियावर रिल्स करायची. अनेकदा तिच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरातून लोकांना खळखळून हसवणारे रिल्स ती शेअर करायची. पण, त्याच स्वयंपाक घरात पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेत तिनं आत्महत्या केली.
नेहमी हसत-खेळत रिल्स शेअर करणाऱ्या रोहिणीनं असं टोकाचं पाऊल का उचललं? हाच प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून अनेकांच्या मनात आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आणि त्यानंतर तपास सुरू केला.सुरुवातीला तणावामुळे झालेल्या वादातून रोहिणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. पोलिसांनी सीडीआर तपास देखील केला. मात्र, या प्रकरणात कुठलेच धागेदोरे हाती लागले नाहीत. पण, आता पोलिसांनी रोहिणीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे खळबळ माजली आहे.
रिलस्टार रोहिणी पाराध्ये हिचे वडील बाळू शिवशरण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहिणीचा पती निलेश पारामध्ये विरोधात गुन्हा दाखल केला आहे.निलेश पाराध्ये रोहिणीला तिच्या मनाविरुद्ध हॉटेलमध्ये काम करायला लावत होता. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्यामुळेच तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय.त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी रोहिणी पाराध्ये हिचा पती निलेश पाराध्ये विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे रोहिणीच्या आत्महत्या प्रकरणात 25 दिवसानंतर या प्रकरणाला नवं वळण प्राप्त झालंय.




