प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; अंबरनाथ, उल्हासनगरात मारहाणीच्या सलग घटना
मुंबई (प्रतिनिधी) : अंबरनाथमध्ये प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेल्या अमानुष मारहाणीमध्ये एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरात मारहाण व दहशतीच्या आणखी दोन घटनाही समोर आल्या असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पहिली घटना अंबरनाथमधील असून, ओम खोरे या तरुणाचा मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 23 जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून संदीप गवळी याने आपल्या साथीदारांसह ओमचे कथित अपहरण केले. त्यानंतर एका मैदानात नेऊन लोखंडी रॉड, बांबू आणि चाकूने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सुरुवातीला हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून संदीप गवळी आणि रवी परमार यांना अटक केली होती. मात्र ओमचा मृत्यू झाल्यानंतर आता आरोपींवर हत्येचे कलम लावण्यात येणार असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.
दरम्यान, अंबरनाथ पूर्वेतील राम अंबर सोसायटी परिसरात वकील सतीश गायकवाड यांच्या कार्यालयात घुसून काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. कार्यालयासमोर बसून शिवीगाळ व गोंधळ घालणाऱ्या तरुणांना त्यांनी विरोध केला होता. त्याचाच राग मनात धरून संबंधितांनी कार्यालयात घुसून मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि कार्यालयातील रोकडही लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
तिसरी घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 परिसरातील आहे. बुलेट आणि अॅक्टिव्हा या दोन वाहनांमध्ये किरकोळ धडक झाल्यानंतर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद पुढे हिंसक स्वरूप धारण करत 5 ते 7 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला घेरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरात अल्प कारणांवरून वाढत चाललेल्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे.




