'ऑफर आली तर विचार करू' वक्तव्यावर अखेर मोठं स्पष्टीकरण; शरद पवार साहेब सांगतील तेच
मुंबई (प्रतिनिधी) : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. "सत्ताधाऱ्यांकडून ऑफर आली तर विचार करू," या विधानानंतर ते भाजपमध्ये जाणार का, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता स्वतः अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

कोल्हे यांनी स्पष्ट सांगितले की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी "जर रेल्वे प्रकल्पासाठी अशी काही ऑफर आली तर विचार करू," असे म्हटले होते. हे विधान केवळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात होते, पक्षांतराच्या संदर्भात नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरील आपली निष्ठाही पुन्हा एकदा अधोरेखित केली. "राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकसंघ आहे. आदरणीय शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण," असे ठाम शब्दांत कोल्हे म्हणाले.तसेच सुप्रिया सुळे या आमच्या गटनेत्या असून, पक्षाचे सर्व आठही खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले. "मी कुठेही जाणार नाही," असे स्पष्ट शब्दांत सांगत भाजप प्रवेशाच्या सर्व चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या.
याच पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनीही 'ऑपरेशन तुतारी'च्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे सांगितले. आम्ही सर्व खासदार एकत्र असून शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असा पुनरुच्चार त्यांनी केला.मतदारसंघातील विकासकामांबाबत बोलताना भगरे म्हणाले की, विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी मिळण्यात अडचणी येत असल्या तरी सध्या सरकारकडेच निधीची कमतरता असल्याची परिस्थिती आहे.दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




