बेळगावमध्ये गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण: भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर

बेळगावमध्ये गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण: भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर

बेळगाव: गणेशोत्सवाच्या उत्साहात बेळगावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील चव्हाट गल्ली परिसरात एका दुकानाला आणि निवासी घराला अचानक भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दमोने यांच्या घरातून अचानक आगीच्या मोठ्या ज्वाळा निघू लागल्या. आगीने अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण घराला वेढल्यामुळे आत असलेल्या सदस्यांना बाहेर पडण्यास वाव मिळाला नाही. या दुर्दैवी दुर्घटनेत गजानन दमोने (६५), शारदा दमोने (४५), भारती दमोने (५०) आणि रोशन दमोने (२१) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रिया दमोने (२८) व गंगा दमोने (२५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घरातील फ्रिजचा अचानक स्फोट (शॉर्ट सर्किट) झाल्यामुळे ही आग भडकल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. क्षणार्धात पसरलेल्या आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाला. मजुरी करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या या दमोने कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण प्रसंगाने संपूर्ण बेळगाव शहर आणि चव्हाट गल्ली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पथक आणि अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. पोलीस सध्या आगीच्या अचूक कारणाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.