भाजप प्रवेशात आता मला रस नाही, मी शरद पवारांसोबतच...; एकनाथ खडसेंनी घेतला मोठा यू-टर्न; गिरीश महाजनांनाही टोला
जळगाव: गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता एक मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. "मला आता भाजप प्रवेशामध्ये कोणताही रस राहिलेला नाही, मी शरद पवारांसोबतच राहणार आहे," असे स्पष्ट करत खडसेंनी आपल्या घरवापसीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी आपली ही भूमिका मांडली असून, यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

"मी शरद पवारांसोबतच राहीन"; खडसेंचा मोठा निर्णय
आपला निर्णय जाहीर करताना एकनाथ खडसे म्हणाले, "मी हे अत्यंत स्पष्ट करू इच्छितो की, भाजप प्रवेशामध्ये आता मला कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाही. मी सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे आणि भविष्यातही त्यांच्यासोबतच राहीन. माझ्या भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हा दावा मी अजिबात मान्य करणार नाही." या विधानामुळे जळगावच्या आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
गिरीश महाजनांच्या 'त्या' वक्तव्यावर खडसे संतापले
या संपूर्ण वादाची ठिणगी संकटमोचक समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या एका मिश्किल विधानामुळे पडली. महाजन म्हणाले होते, "एकनाथ खडसे यांची थेट दिल्लीत वरिष्ठ पातळीवर हॉटलाईन आहे. मी खूप छोटा माणूस आहे, माझी तर मुंबईपर्यंतही हॉटलाईन नाही. आपण जळगावमध्येच बरे आहोत." गिरीश महाजनांच्या या टिप्पणीवर एकनाथ खडसे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
खडसेंनी घेतलेल्या या भूमिकेनंतर आता जळगाव जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




