पक्ष फोडला म्हणून एकदा बक्षीस दिलं, पुन्हा नाही ! संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात ; फडणवीसांनाही लगावला टोला

पक्ष फोडला म्हणून एकदा बक्षीस दिलं, पुन्हा नाही ! संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात ; फडणवीसांनाही लगावला टोला

मुंबई : "देवेंद्र फडणवीस जर केंद्रात गेले, तरीही एकनाथ शिंदे पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत," असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी 'फडणवीस केंद्रात गेल्यास शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील' असे विधान केले होते. या विधानाचा खरपूस समाचार घेत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले आहे.

"शिवसेना फोडण्यासाठी शिंदेंचा वापर केला"
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, "एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, या माझ्या मतावर मी ठाम आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्यासाठी केवळ एकनाथ शिंदेंचा वापर केला गेला. पक्ष फोडल्याचे बक्षीस म्हणून त्यांना काही काळासाठी मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. आता त्यांचे काम संपले आहे."

"महाराष्ट्र फडणवीसांच्या हातात राहिलेला नाही"
देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले, "केंद्रात जर फेरबदल झाले आणि नरेंद्र मोदींना वाटले की फडणवीस केंद्रात एखाद्या खात्याचे नेतृत्व करू शकतात, तर त्यांनी जरूर जावे. आमच्या मते ते १०० टक्के योग्य आहेत, कारण महाराष्ट्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राहिलेला नाही. राज्यात गुंडांचे राज्य सुरू झाले आहे. फडणवीस केंद्रात गेले आणि त्यांना अर्थखाते मिळाले, तर महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, बाहेरील व्यक्तीला हे पद मिळणार नाही. पक्ष फोडला म्हणून एकदा मुख्यमंत्री केले, पुन्हा करणार नाहीत; कारण ती भाजपची परंपराच नाही."

"शिंदेंनी उद्या भाजपवरही दावा केला तर..."
एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टोमणा मारताना संजय राऊत पुढे म्हणाले, "उद्या एकनाथ शिंदे यांनी त्यांचा गट भाजपमध्ये विलीन केला आणि सांगितले की, 'मीच ओरिजनल भाजपाय आहे, तुम्ही सगळे नंतर आलात आणि भाजपची स्थापना मीच केली आहे,' तर नवल वाटायला नको. कारण सध्या ते जसे 'शिवसेनेचा संस्थापक मीच आहे' असे सांगत फिरतात, तसेच ते भाजपबाबतही करू शकतात." संजय राऊत यांच्या या विधानानंतर आता महायुतीकडून काय पलटवार होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.