भारताला विकसित देश बनविण्यात विद्यार्थ्यांची मोठी जबाबदारी- डॉ. जॅसमिन
विक्रमसिंहजी घाटगे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
कागल/प्रतिनिधी : भारताची जगातील प्रगत राष्ट्रांशी स्पर्धा सुरू आहे.२०४७ मध्ये स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होताना भारताला विकसित देश बनविण्यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असेल,असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमिन यांनी केले.

सहकारमहर्षी राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७८व्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झाला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे होत्या.
डॉ.जॅसमिन पुढे म्हणाल्या,विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.शालेय अभ्यासाबरोबर अवांतर वाचन,स्वच्छता,जंक फूडऐवजी सकस आहार, नियमित व्यायाम आणि अभ्यासातील सातत्य अंगीकारावे.मुलींनी स्वतःला कमी न लेखता प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जावे.शिक्षक व पालकांनी मुलगा-मुलगी असा भेद न करता समान संधी द्यावी.
अध्यक्षीय मनोगतात नवोदितादेवी घाटगे म्हणाल्या, स्व.राजेसाहेबांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.विकसित भारत घडविण्यासाठी पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर शालेय जीवनापासूनच जबाबदारीचे संस्कार करावेत.
यावेळी हर्षदा खापणे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक संजय नरके,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, अविनाश कांबळे, नगरसेवक उमेश सावंत,विजय बोंगाळे,युवराज पसारे,टी.जी.आवटे,प्रशासन अधिकारी एम.व्ही. वेसवीकर, मुख्याध्यापक शिवाजी खोत,मुख्याध्यापिका जे.व्ही.चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत एस.बी.सासमिले यांनी, तर आभार निलेश सुतार यांनी मानले.
मोबाईलचा वापर करा; मोबाईलला तुमचा वापर करू देऊ नका
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल व संगणकाचा उपयोग अभ्यास व ज्ञानवृद्धीसाठी करा. मनोरंजनासाठी त्यावर अधिक वेळ घालवू नका. अतिवापरामुळे विचारक्षमता खुंटू शकते. त्यामुळे ‘तुम्ही फोनचा वापर करत आहात की फोन तुमचा वापर करत आहे?’ याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा,असे आवाहन डॉ.जॅसमिन यांनी केले.




