मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार नाहीत; भाजप आमदाराचा हल्लाबोल

मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार नाहीत; भाजप आमदाराचा हल्लाबोल

गोंदिया : कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्यावरून आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राजकीय नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान जरांगे यांनी सरकारवर तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या बोचऱ्या टिकेमुळे भाजप आक्रमक झाली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत घणाघाती टीका केली आहे.

गोंदिया येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार विजय रहांगडाले यांनी जरांगे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी ते म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील हे मानसिकदृष्ट्या विकृत स्वभावाचे असून त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत." सार्वजनिक जीवनात टीका करताना भाषेची मर्यादा आणि आचारसंहिता पाळणे गरजेचे असते, मात्र जरांगे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

राजकीय वातावरण तापले

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात मनोज जरांगे यांनी सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये विविध इशारा बैठका घेतल्या. या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट टीका केली होती.

या राजकीय संघर्षात आता भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी आक्रमक भूमिका घेत, जरांगे यांना कोणाला काय आणि कसे बोलावे याचे भान उरलेले नाही, अशा शब्दांत सुनावल्याने आगामी काळात या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि आंदोलकांमध्ये आणखी खडाजंगी उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.