मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट; आज-उद्या पाऊस, त्यानंतर मोठी उघडीप! हवामान खात्याचा बळीराजाला महत्त्वाचा सल्ला

मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट; आज-उद्या पाऊस, त्यानंतर मोठी उघडीप! हवामान खात्याचा बळीराजाला महत्त्वाचा सल्ला

पुणे (प्रतिनिधी) : मराठवाड्यात आज आणि उद्या काही भागात पावसाची शक्यता असली, तरी त्यानंतर पावसाची मोठी उघडीप राहण्याचा अंदाज आहे. 27 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता कमी असल्याने, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने शेतकऱ्यांना विशेष कृषी सल्ला दिला आहे.पिकांना पाण्याचा ताण येऊ नये यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सूक्ष्म सिंचनाचा वापर करून पाणी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार कीड-रोग नियंत्रणासाठी फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. याशिवाय सोयाबीनवर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान शास्त्र विभाग प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "सध्या भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांमध्ये आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. उद्या जवळपास 50 टक्के भागात पावसाची शक्यता आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्हा वगळता इतर ठिकाणी पावसाची ॲक्टिव्हिटी फार तुरळक असून, तोही हलक्या स्वरूपाचा असेल.

मागील 10 दिवसांचा पावसाचा आढावा घेतला, तर पावसाची तूट नक्कीच आहे. जवळपास 480 महसूल मंडळांच्या हवामान केंद्रांचा डेटा आपल्याला प्राप्त होतो. त्यानुसार मागील 10 दिवसांमध्ये साधारण 116 महसूल मंडळांमध्ये 5 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर 300 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये 5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

10 दिवसांतील परिस्थिती आणि जमिनीतील ओलावा पाहिला, तर बऱ्याच ठिकाणी पिकांमध्ये जमिनीतील ओलावा चांगला आहे. मात्र असेही अनेक भाग आहेत, जिथे पाऊस झालेला नाही. प्रत्येक गावातील पावसाची नोंद घेणे शक्य नसल्यामुळे, बहुतांश भागांमध्ये पावसाची कमतरता दिसून येत आहे.

पिकांची परिस्थिती सध्या चांगली दिसत असली, तरी लातूर, बीड आणि जालन्याच्या काही भागात कमी पावसामुळे पिके आता फुलोरा अवस्थेत आहेत. काही ठिकाणी अगोदर लागवड झालेल्या पिकांमध्ये शेंगा लागलेल्या आहेत. सोयाबीनमध्ये पाते आहेत, तर कापसामध्येही सध्या महत्त्वाच्या अवस्था सुरू आहेत. या सगळ्या पिकांच्या नाजूक अवस्था आहेत. त्यामुळे आता पाण्याची आणि सिंचनाची आवश्यकता आहे.

आता प्रश्न आहे तो पावसाचा. भारतीय हवामान विभागासोबत झालेल्या चर्चेनुसार 27 ऑगस्टपर्यंत आपल्या भागात फार मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता नाही. उद्याचा दिवस सोडला, तर हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या आठवडाभरात पिकांसाठी परिस्थिती नाजूक राहण्याची शक्यता आहे," अशी माहिती डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली.

शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अशा परिस्थितीत उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कापूस आणि तुरीच्या बाबतीत अंतर्गत मशागत करणे महत्त्वाचे आहे. तर सोयाबीनमध्ये सध्याच्या परिस्थितीत पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

यासोबतच ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांनी पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. कारण पुढील काळात फार मोठ्या पावसाची शक्यता नाही. उद्याचा एक दिवस गेल्यानंतर, परवापासून ज्या भागात पाऊस पडणार नाही, त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यानुसार सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाणी देणे आवश्यक आहे," अशी माहिती डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली आहे.