मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; १.२५ लाख चालकांनी शिकली मराठी
ठाणे:"मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा आहे. अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे हीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची खरी ताकद आहे," असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियाना’च्या सांगता समारंभात ते बोलत होते.

१.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांचा उपक्रम:
१०५ दिवस चाललेल्या या अभियानातून तब्बल १.२५ लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षा उत्तीर्ण केली. सर्व यशस्वी चालकांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रेमाने भाषा शिकवण्यावर भर:
"कायद्याचा बडगा दाखवून नाही, तर प्रेमाने भाषा शिकवली जाते," अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीतच संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'धर्मवीर आनंद दिघे महामंडळाचा' ५० कोटींचा निधी भविष्यात १,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा संकल्प उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
शासकीय योजना व राज्याचा विकास:
आपल्या भाषणात त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना', मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत यांसारख्या निर्णयांचा आवर्जून उल्लेख केला. तसेच महाराष्ट्र उद्योग, स्टार्टअप, जीडीपी आणि परकीय गुंतवणुकीत देशात अव्वल स्थानावर असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड आणि अभियान समन्वयक डॉ. ज्योती ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा-टॅक्सी चालक व नागरिक उपस्थित होते.




