मुंबई महापालिकेच्या इनोव्हा खरेदीवर वाद; फडणवीस नाराज, प्रस्ताव मागे घेण्याच्या हालचाली

मुंबई महापालिकेच्या इनोव्हा खरेदीवर वाद; फडणवीस नाराज, प्रस्ताव मागे घेण्याच्या हालचाली

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी नवीन इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याच्या टीकेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला, गाड्यांचा प्रस्ताव तात्काळ रद्द करा. मुंबईकरांचा पैसा हा मुंबईकरांच्या सुविधा आणि विकासकामांसाठीच खर्च झाला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. जनतेच्या पैशाचा वापर केवळ विकासकामांसाठी व्हावा आणि अनावश्यक खर्च टाळावा, अशी त्यांची भूमिका असल्याचेही समजते.

या प्रकरणामुळे मुंबई महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चौफेर टीका झाली. वाढत्या विरोधानंतर हा प्रस्ताव मागे घेण्याची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये महापालिकेने महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी एकूण 13 नवीन वाहने खरेदी केली होती. यामध्ये महापौरांसाठी इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी 12 स्कॉर्पिओ-एन गाड्यांचा समावेश होता. या खरेदीवर सुमारे 2 कोटी 16 लाख रुपयांचा खर्च झाला होता.

दरम्यान, स्कॉर्पिओ-एन गाड्या प्रवासासाठी सोयीस्कर नसल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांसाठी इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, प्रस्तावाची माहिती सार्वजनिक होताच त्यावर टीकेची झोड उठली आणि आता तो मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.