शरद पवारांच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "विचारधारा महत्त्वाची"
मुंबई (प्रतिनिधी) : संसदेत लोकसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेचे विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी भाजपकडून राष्ट्रीय स्तरावर खासदारांच्या आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत सत्तेत सामील होऊ शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नुकतीच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत शरद पवार गट सत्तेत आल्यास त्यांना काय मिळणार, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीएमध्ये जायचंय या चर्चा 100 टक्के सुरु आहेत. विचारधारा सोडून तिकडे जायचं की विचारांची कास धरुन आमच्याकडे यायचं हे त्यांनी ठरवावं. ज्यांना आमच्याकडे यायचंय त्यांचं स्वागत आम्ही करतो. शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्याकडून चर्चा होत असल्याचा निरोप आला नाही. आम्ही त्यांच्यासोबत चर्चेला तयार आहोत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप तसे संकेत आलेले नाहीत, असे काँग्रेसचे नेत विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. यावर आता शरद पवार गटाचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, हे बघावे लागेल.




