शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प; शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये साहित्य वाटप!

शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प; शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये साहित्य वाटप!

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला. संस्थेच्या दिवंगत सचिव ज्ञानज्योती प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे यांच्या ५४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध माध्यमिक विद्यालयांमध्ये वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी आणि रजिस्ट्रार अमित आवाड यांनी आरे, माजगाव, भामटे आणि परखंदळे येथील माध्यमिक विद्यालयांना भेट दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानज्योती सौ. शुभांगीताई गावडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेऊन वृक्षारोपण करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

तसेच, इन्स्टिट्यूटच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वाटचालीस उपयुक्त ठरणारे शालेय साहित्य भेट देण्यात आले. या प्रसंगी प्रा. सुशील मगदूम, प्रा. प्रवीण भट आणि प्रा. हेमंत कुंभार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य विरेन भिर्डी म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे जतन केल्यास पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळेल. शुभांगीताई गावडे यांचा ज्ञानदानाचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेणे हाच खरा उन्नतीचा मार्ग आहे."

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प इन्स्टिट्यूटच्या वतीने व्यक्त करण्यात आला.