सी-वन कॅटेगिरीच्या धोकादायक इमारतीमधील नागरिकांना सक्तीने बाहेर काढणार; भिवंडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

सी-वन कॅटेगिरीच्या धोकादायक इमारतीमधील नागरिकांना सक्तीने बाहेर काढणार; भिवंडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

भिवंडी : शहरातील नारपोली येथील भंडारी चौक परिसरातील गंगाराम वाडीतील 'कोहिनूर अपार्टमेंट'च्या बी विंगचा भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (३० जुलै) रात्री उशिरा घडलेल्या या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच सी-वन (C-1) प्रवर्गातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना सक्तीने बाहेर काढण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:

·         दोषींवर फौजदारी कारवाई: मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही इमारत 'सी-वन' कॅटेगरी म्हणजेच अत्यंत धोकादायक घोषित करण्यात आली होती आणि ती रिकामी करण्याचे आदेशही दिले होते. प्रशासनाच्या माहितीनुसार २५ जणांनी ती रिकामी केली होती, मात्र त्यानंतरही कंत्राटदाराच्या लोकांनी तिथे दुरुस्तीचे काम सुरू ठेवल्याने ही दुर्घटना घडली. त्यामुळे अशा कंत्राटदारावर तातडीने फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.

·         मृतांच्या वारसांना मदत: या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त करत मृतांच्या वारसांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

·         सक्तीने हकालपट्टीचे निर्देश: धोकादायक इमारतींमधून अनेकदा लोक स्वेच्छेने बाहेर पडत नाहीत. मानखुर्द दुर्घटनेचा दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले की, मानवी जीव सर्वात महत्त्वाचा आहे. न्यायालयाच्या काही मर्यादा आणि निर्देश असले, तरीही लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रसंगी सक्ती करून त्यांना अशा इमारतींमधून बाहेर काढणे गरजेचे असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.