३००० कोटींचे मालक असलेले आमदार पराग शाह एका दिवसासाठी का बनले भिकारी ?
मुंबई: अभिनेता स्वप्नील जोशीच्या 'भिकारी' चित्रपटातील कथा खऱ्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरल्याचा अनोखा प्रकार मुंबईत समोर आला आहे. मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळखले जाणारे घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शाह यांनी गुरुंच्या आज्ञेवरून तब्बल ३००० कोटींची संपत्ती, गाड्या आणि सुरक्षाव्यवस्था बाजूला ठेवून एका दिवसासाठी रस्त्यावर भिकारी बनण्याचा अनुभव घेतला.

गुरुंच्या आदेशावरून घेतला अनोखा अनुभव
सध्या जैन धर्मियांचा चातुर्मास सुरू असून आमदार पराग शाह यांचे गुरु नम्रमुनी यांनी त्यांना एक दिवस भिकारी बनून जीवन जगण्याचा सल्ला दिला होता. गुरुंच्या आदेशाचे पालन करत आमदार शाह यांनी भिकाऱ्याचा वेष धारण केला आणि घाटकोपरच्या रस्त्यांवर काही तास घालवले. त्यांनी रस्त्याच्या कडेला बसून भीक मागितली, तेच खाल्ले आणि भिकाऱ्यांच्या दैनंदिन आयुष्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. गर्दीच्या आणि व्यस्त भागात त्यांना कोणीही ओळखू शकले नाही.
नागरिकांचे विविध अनुभव; राजकीय वर्तुळात चर्चा
भिकारी म्हणून वावरताना अनेक जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेले, काहींनी थोडी मदत केली, तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. हा अनुभव घेतल्यानंतर आमदार शाह यांनी मेकअप काढून ज्या ज्या ठिकाणी ते गेले होते, तेथे जाऊन पुन्हा त्या लोकांशी संवाद साधला. कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असतानाही केवळ गुरुंच्या आज्ञेसाठी आणि सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेण्यासाठी घेतलेल्या या कठीण अनुभवाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.




