32 कोटींच्या व्यवहारातून हत्येचा कट? कंपनी अध्यक्षानेच एमडींना संपवण्याचा रचला डाव
मुंबई (प्रतिनिधी) : वसईतील प्रसिद्ध उद्योजक मोहनसिंग परमार यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा धक्कादायक कट वालीव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात ‘जीएसएम फॉइल्स’ कंपनीचा अध्यक्ष सागर भानुशाली याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. परमार यांच्याकडून घेतलेले 32 कोटी रुपये परत न करण्यासाठी आणि कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी हा हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सागर भानुशाली हा ‘जीएसएम फॉइल्स’ कंपनीचा अध्यक्ष आहे, तर हल्ल्यात जखमी झालेले मोहनसिंग परमार हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, इराण-इस्रायल संघर्षामुळे अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम सागर भानुशालीच्या आर्थिक स्थितीवर झाला. त्यातून त्याच्यावर मोठे कर्ज झाल्याचे तपासात समोर आले आहे.
या घटनेचा परिणाम कंपनीच्या शेअरवरही झाला असून, ‘जीएसएम फॉइल्स’चा शेअर एनएसईवर 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 192 रुपयांवर बंद झाला. मात्र कंपनीने एनएसईला माहिती देताना वरिष्ठ व्यवस्थापनाकडून आवश्यक पावले उचलण्यात आली असून, वसई आणि अहमदाबाद येथील उत्पादन प्रकल्प सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
24 जुलै रोजी वसई पूर्वेतील नवजीवन परिसरातील डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये हा हल्ला झाला होता. मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी कंपनीच्या आवारातच मोहनसिंग परमार यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये एक गोळी त्यांच्या खांद्याला लागली. दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला, मात्र पिस्तूल जॅम झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
तपासादरम्यान सागर भानुशाली हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे वालीव पोलिसांनी उत्तर प्रदेश एसटीएफच्या मदतीने सागर भानुशालीला अटक केली. त्यानंतर त्याच्या इतर सहा साथीदारांनाही वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोहनसिंग परमार यांच्या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. त्यापैकी 5 लाख रुपये आगाऊ देण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या मोहनसिंग परमार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.




