Gen-Z, Reels आणि AI वर तुकाराम मुंढेंचं भाष्य; "विवेकच सर्वात मोठं शस्त्र"

Gen-Z, Reels आणि AI वर तुकाराम मुंढेंचं भाष्य; "विवेकच सर्वात मोठं शस्त्र"

मुंबई (प्रतिनिधी) : अमरावतीमध्ये आयोजित 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात एफडीएचे आयुक्त तथा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी जेन-झी पिढीला प्रेरणादायी संदेश दिला. यशाच्या कथा पाहण्यापेक्षा अपयशातून शिकण्याची तयारी ठेवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगताना त्यांनी स्वतःलाही स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात तीन वेळा अपयश आल्याचा अनुभव मांडला.

मुंढे म्हणाले, समाज फक्त यशाकडे पाहतो, मात्र त्या यशामागील संघर्ष आणि अपयशाकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे तरुणांनी न्यूनगंड न बाळगता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवू नये आणि एआयचा वापर विवेकाने करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

नागपूर आणि अमरावतीतील कार्यक्रमांमध्ये बोलताना त्यांनी जेन-झी पिढीला झुंडशाहीविरोधात उभे राहण्याचे, सोशल मीडियावरील माहितीचा स्रोत तपासण्याचे आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. योग्य दिशा मिळाल्यास भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश बनू शकतो, असेही ते म्हणाले.

रील्स आणि सोशल मीडिया अल्गोरिदमबाबत बोलताना मुंढे म्हणाले, अल्गोरिदमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ठराविक विचार पोहोचवले जातात. तुमचा डोपामाइन वाढवण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा तयार करण्यात आली आहे. याचा सर्वाधिक परिणाम भारतासारख्या तरुण लोकसंख्या असलेल्या देशावर होत आहे.

ते पुढे म्हणाले, आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, पण जर आपले विचारही आपले राहिले नाहीत, तर आपण खरोखर मुक्त आहोत का? फक्त माहिती किंवा ज्ञान पुरेसे नाही, तर विवेक जागा ठेवणे गरजेचे आहे. रील्सच्या प्रवाहात वाहून जाण्याऐवजी थांबून विचार करण्याची सवय लावली पाहिजे.

वादसंस्कृतीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, आज विचारांची देवाणघेवाण कमी आणि केवळ आवाज जास्त झाला आहे. ऐकण्याची सवय कमी होत चालली आहे. त्यामुळे AI, अल्गोरिदम किंवा मशीनपेक्षा माणसाचा विवेकच सर्वात मोठा मार्गदर्शक आहे. त्याची कास धरणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.