तेरसवाडी पैकी कदमवाडी येथील 'चव्हाट्याचा माळ' परिसरात बिबट्याचे दर्शन
प्रतिनिधी ( विश्वनाथ मोरे ) : करवीर तालुक्यातील तेरसवाडी कदमवाडी येथील 'चव्हाट्याचा माळ' परिसरात , मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

गव्यांच्या उपद्रवामुळे कदमवाडी येथील शेतकरी संभाजी कदम आणि दयानंद कदम हे सोमवारी रात्री आपल्या शेताची राखण करण्यासाठी 'चव्हाट्याचा माळ' नावाच्या शेतातील माचळीवर वस्तीला होते. पहाटेच्या वेळी कुत्र्यांच्या भुंकण्याचा विलक्षण आवाज आल्याने त्यांना शंका आली. त्यांनी सतर्क होऊन परिसरात पाहणी केली असता, त्यांना बिबट्या प्रत्यक्ष नजरेस पडला. यावेळी दोघेही शेतकरी भयभीत झाले. त्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा लोळजाई पठार परिसराकडे वळवला आणि तो तेथून पसार झाला.
या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. कदमवाडी, मल्लेवाडी, तेरसवाडी आणि पाली या गावांमधील शेतकरी सध्या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वारंवार निदर्शनास येत आहे. पहाटे किंवा रात्रीच्या वेळी शेतात पाणी पाजण्यासाठी किंवा राखणीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिवाला यामुळे धोका निर्माण झाला आहे.बिबट्या लोळजाई पठाराकडे गेल्याने तो पुन्हा मानवी वस्तीत किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा. व गव्यांचाही बंदोबस्त करावा.अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे .




