पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रशासन हाय अलर्टवर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रशासन हाय अलर्टवर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा आणि घाटमाथा परिसरात गेल्या ४-५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. हवामान खात्याने दिलेला 'ऑरेंज अलर्ट' आणि धरण क्षेत्रातून होणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता, संपूर्ण जिल्हा प्रशासन 'अलर्ट मोड'वर असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी दिली आहे.

जून आणि जुलै महिन्याचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ६४ टक्के पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावरील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पंचगंगा नदीवरील प्रसिद्ध राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३३ फूट १० इंचावर पोहोचली आहे. या बंधाऱ्याची इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूट आहे. नदीची पातळी इशारा पातळीवर पोहोचण्यापूर्वीच प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

सध्या पंचगंगा नदीचे पाणी शहर परिसरात पात्राबाहेर आले असले, तरी अद्याप कोणत्याही रहिवासी भागात पूरस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे सध्यातरी कोणालाही सुरक्षित स्थलांतरित (शिफ्ट) करण्याची आवश्यकता भासलेली नाही. मात्र, अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा व पर्यायी व्यवस्था प्रशासनाने आधीच तयार ठेवल्या आहेत.

जिल्ह्यातील संततधार पावसामुळे आतापर्यंत जवळपास ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे काही राज्य महामार्ग (स्टेट हायवे) आणि जिल्हा मार्ग पूरपरिस्थितीमुळे प्रभावित झाले आहेत. परंतु, प्रशासनाने या मार्गांवर तात्काळ पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने सध्या वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. संपूर्ण प्रशासन पूर्ण खबरदारी घेऊन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.