सहकारातून समृद्धी! 'गोकुळ'च्या सर्व प्रकल्पांवर औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण; कर्मचाऱ्यांना मिळाले खास मार्गदर्शन
कोल्हापूर/ प्रतिनिधी : भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आवाहनानुसार, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'मध्ये २९ जून ते ६ जुलै या कालावधीत सहकार सप्ताह आणि आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला! "सहकारातून समृद्धी" या संकल्पनेवर आधारित विविध सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रम यावेळी राबविण्यात आले.

या सप्ताहाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा दिलेला संदेश! गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या प्रांगणात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. गोकुळचे प्रशासक प्रदीप मालगावे आणि सागर बलकवडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यासोबतच गोकुळ शिरगाव, गोगवे, बोरवडे, लिंगनूर, तावरेवाडी या शीतकरण केंद्रांवर आणि पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगीसह कागल प्रकल्पातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.
"सहकार ही केवळ संस्था चालविण्याची संकल्पना नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. हे उपक्रम सहकाराची मूल्ये अधिक मजबूत करतील."
संस्थेच्या सक्षमीकरणासाठी गोकुळच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. अनिल कारंजकर यांनी "सहकार व्यवस्थापन व त्यापुढील आव्हाने" या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. बदलत्या काळातील आव्हाने आणि संस्था-कर्मचारी यांच्यातील समन्वयाचे महत्त्व त्यांनी यावेळी पटवून दिले.
गोकुळच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सप्ताहातील सर्व उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य, विविध विभागांचे महाव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.




