बालिंगा ते दाजीपूर राज्यमार्गाचे कोट्यवधींचे काम रामभरोसे! निकृष्ट दर्जा आणि अर्धवट कामांमुळे वाहनधारक धोक्यात

बालिंगा ते दाजीपूर राज्यमार्गाचे कोट्यवधींचे काम रामभरोसे! निकृष्ट दर्जा आणि अर्धवट कामांमुळे वाहनधारक धोक्यात

करवीर तालुका /प्रतिनिधी (विश्वनाथ मोरे) : कोट्यवधी रुपये खर्च करून उभारला जाणारा बालिंगा ते दाजीपूर राज्यमार्ग सध्या वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसाळा सुरू झाला तरी रस्ता अर्धवटच असून, या कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. बिडशेड बाजारपेठ परिसरात रस्ता अपूर्ण असल्याने पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्याच्या मध्यभागी उघड्या पडलेल्या लोखंडी सळ्यांमुळे वाहनांचे टायर पंक्चर होऊन रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यातच रस्त्याला लागून असलेल्या विहिरींना सुरक्षा कठडेच नसल्याने मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे.

 या समस्येमुळे शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवूनही कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करत आहे, तर दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र 'तेरी भी चूप, मेरी भी चूप'ची भूमिका घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा राज्यमार्ग सर्वसामान्यांसाठी आहे की फक्त कंत्राटदाराच्या भल्यासाठी? असा सवालही नागरिक करत आहेत.