भाजपचा पहिला उमेदवार ठरला? तरुण नेत्याची देवेंद्र फडणवीस यांच्याशी रात्री भेट; चर्चांना उधाण

भाजपचा पहिला उमेदवार ठरला? तरुण नेत्याची देवेंद्र फडणवीस यांच्याशी रात्री भेट; चर्चांना उधाण

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये समावेश असलेल्या विवेक कोल्हे यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यंदा भाजपकडून विधान परिषदेसाठी  विवेक कोल्हे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विवेक कोल्हे यांच्या विधान परिषदेसंदर्भात भाष्य केले होते. अशात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली कोल्हे यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे विवेक कोल्हे यांची विधानपरिषदेची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा रंगली आहे. 

नगर जिल्ह्यात कोल्हे परिवाराचे  वर्चस्व मानले जाते.  विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. कोपरगावात काळे-कोल्हे असा जुना संघर्ष पूर्वापार आहे. अशात, विधानसभा निवडणुकीवेळी आशुतोष काळे यांना राष्ट्रवादी कांग्रेसनं कोपरगावमधून संधी दिल्यानंतर भाजपकडून कोल्हे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांना थेट गृहमंत्री अमित शाह यांची भेटदेखील घालून दिली होती. आता भाजपची विधान परिषद उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना कोल्हे आणि फडणवीस यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना विधानपरिषदेवर संधी द्यायची नाही, असे धोरण स्वीकारल्याची माहिती आहे. याउलट संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना आणि जातीय समीकरणे साधणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे भाजपने घेतला होता. त्यानुसार, माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे यांची नावं उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.