भाजपच्या निष्ठावंतांवरील पोस्टनंतर अर्चना पाटलांचा यू-टर्न; म्हणाल्या, 'टीमकडून चुकून स्टेटस अपलोड झाले
मुंबई (प्रतिनिधी) : धाराशिव भाजपमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटसवरून निर्माण झालेल्या वादावर अखेर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्टीकरण देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील अभूतपूर्व यशामुळे पक्षाच्या एकजुटीला तडा जावा, यासाठी काहींकडून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सोशल मीडिया टीमकडून पूर्वपरवानगीशिवाय अनवधानाने संबंधित मजकूर पोस्ट झाल्याचे सांगत, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त केली आहे. पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित हेच आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी अर्चना पाटील यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये, स्वतःला निष्ठावंत म्हणवणाऱ्या भाजपच्या जुन्या नेत्यांनी गेल्या 30 वर्षांत पक्षासाठी नेमके काय योगदान दिले? असा सवाल करण्यात आला होता. या स्टेटसमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा ऐरणीवर आले होते.
दरम्यान, फेसबुक पोस्टमध्ये अर्चना पाटील यांनी म्हटले की, त्या सध्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी परदेशात असून वेळेतील फरकामुळे सोशल मीडिया टीमने पूर्वपरवानगी न घेता अधिकृत स्टेटसवर मजकूर प्रसिद्ध केला. त्या मजकुरामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल त्यांनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे.
तसेच त्यांनी नमूद केले की, भारतीय जनता पक्ष हा लाखो कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार आहे. धाराशिवमध्ये सर्वांनी एकजुटीने काम करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मोठे यश मिळवले असून, या एकजुटीला तडा जावा असे काही घटक प्रयत्न करत आहेत. मात्र पक्षहित, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि एकजूट कायम राखणे हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आमदार बसवराज पाटील यांच्या स्वागत कार्यक्रमात राणाजी विजयसिंह पाटील यांना वगळण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर भाजपमधील काही जुन्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांनीही भाजप कोणत्याही एका कुटुंबाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, असे वक्तव्य केले होते.
या पार्श्वभूमीवर अर्चना पाटील यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे पक्षातील जुने-नवे नेते आणि कार्यकर्त्यांमधील वादाला आणखी हवा मिळाल्याची चर्चा आहे. अनिल काळे प्रकरण, बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यातील घडामोडी आणि वाढती नाराजी यामुळे धाराशिव भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याचे बोलले जात आहे.




