मोठी महागाई येणार? जितेंद्र आव्हाडांचा इशारा; मोदींच्या आवाहनावर ठाकरे गटाच्या खासदारांचा संताप
मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणातील कार्यक्रमात बोलताना देशवासियांना महत्वाचं आवाहन केलं असून नागरिकांनी वर्षभर सोनं न खरेदी करण्याचा सल्ला मोदींनी दिला. तसेच, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करुन सार्वजनिक वाहतूक वापरण्यावर भर देण्याचे सूचवले. यासह पंतप्रधान अनेक आवाहने देशवासियांना केली आहेत. त्यावरुन, आता नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर, विरोधकांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुका झाल्यानंतरच मोदींनी हे आवाहन का केलंय, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीतील नेते खासदार अरविंद सावंत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींना सवाल केले आहेत.

येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत. घोडा, गाय, म्हैस काय स्वस्त विकणार? जय मोदी, जय मोदी करत गाय-घोडे यांच्यावरती बसून प्रवास करावा लागणार आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. तसेच, येणाऱ्या काळात पेट्रोल मिळणार नाही, अचानक असे काय झाले मोदींना, पेट्रोल डिझेल कमी वापरा म्हणून ते सांगत आहेत. पश्चिम बंगालचे इलेक्शनपर्यंत ही सर्व नौटंकी होती, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. अर्थव्यवस्था एवढी ढासळली आहे, आपला गळा दाबला जाणार आहे, आपण यातून सुटू शकणार नाही. देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम हे सरकार करत होतं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.
मुस्लिम द्वेष निर्माण करतात, हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला. घोडा, बैल मागवा आणि त्यांच्यावर बसून प्रवास करा. मुसलमानांवर बहिष्कार टाका, त्यांच्या वस्तीवरती बहिष्कार टाका, हे सरकार शिकवत आहे. मुस्लिम संदर्भात बोलत आहे. आगामी काळात येत्या काही दिवसात पाहिली नाही अशी महागाई निर्माण होईल, असे भाकीतच आव्हाड यांनी केले. तसेच, मुंबईलाला रोज कामावर चालत जावा हीच देशभक्ती, असेही आव्हाड यांनी म्हटले.
सध्या SIR महाराष्ट्रातदेखील सुरू आहे, लोक गंभीर घेत नाहीत. बंगालमध्ये एसआयआरचा परिणाम होणार होता, हे सर्वश्रुत होते, तिथे 91 लाख मत कापले गेले आहेत. एसआयआरमुळे अनेक गळे परत कापले जातील, ही ठरवलेली बीजेपी पॉलिसी आहे, असेही आव्हाड यांन म्हटले.




