शाहूंच्या कोल्हापुरात संतापजनक प्रकार! महापालिका शाळेतील नोटीस बोर्डावर शिक्षकांच्या 'जाती'चा उल्लेख; नगरसेवक आक्रमक
चौकशी करून दोषींना तात्काळ निलंबित करण्याचे आयुक्त राजेंद्र भारूड यांचे आदेश
कोल्हापूर/प्रतिनिधी: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी आणि समतावादी विचारसरणीच्या कोल्हापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या नेहरूनगर विद्यामंदिरात शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील नोटीस फलकावर शिक्षकांच्या नावासमोर त्यांची 'जात' स्पष्टपणे लिहिण्यात आली होती. हा प्रकार नगरसेवकांनी उघडकीस आणल्यानंतर शिक्षण क्षेत्रात, पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर निलंबनासह कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
संविधानातील समानतेच्या तत्त्वाला हरताळ
नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी हा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आणून दिला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या यादीत प्रत्येक शिक्षकाच्या नावासोबत कंसात त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला होता. हा फलक विद्यार्थी, पालक आणि नागरिक उघडपणे पाहत होते. "शिक्षण हे जात-धर्माच्या पलीकडे असते. मग शाळेसारख्या पवित्र ठिकाणी असा भेदभाव कशासाठी? या प्रकारामुळे संविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर याचे दूरगामी दुष्परिणाम होतील," अशी भीती सोनवणे यांनी व्यक्त केली.
महापालिकेत नगरसेवक आक्रमक; किरणकुमार धनवडे यांच्या निलंबनाची मागणी
या मुद्द्यावरून महापालिकासभागृहात लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. "शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख नेमका कशासाठी? हा जातीय भेदभाव कोणाच्या आदेशानुसार सुरू आहे? यामागे प्रशासनाचा नेमका उद्देश काय?" असा खडा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला.
केवळ नोटीस बोर्ड काढून टाकून भागणार नाही, तर या विकृत मनोवृत्तीमागे असणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीपाहिजे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. नगरसेवक राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे, मुस्ताक मलबारी, दुर्वास कदम आणि आदिल फरास यांनी आक्रमक भूमिका घेत किरणकुमार धनवडे यांना निलंबित करण्याची मागणी केली. याशिवाय, उर्दू शाळेला कमी अनुदान देण्याच्या मुद्द्यावरूनही सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी शिक्षण अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला.
दोषींवर कठोर कारवाई करणार: आयुक्त राजेंद्र भारूड
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड यांनी सभागृहाला आश्वस्त केले की, "या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मुख्याध्यापकांनी परस्पर असा निर्णय घेतला असल्यास त्यांच्याकडून खुलासा मागवून त्यांना तात्काळ निलंबित केले जाईल. तसेच, जर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने असे आदेश दिले असतील, तर त्यांच्यावरही कायदेशीर व कडक कारवाई केली जाईल."
शाळा ही एकता आणि बंधुभाव शिकवण्याचे केंद्र असताना पुरोगामीमहाराष्ट्रात शैक्षणिक संकुलातच अशा प्रकारची जातीय मानसिकता समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.




