अंगणवाडी सेविकेचा व्हिडिओ व्हायरल होताच निलंबन; पोषण आहाराच्या दर्जावर अमोल कोल्हेंचा सवाल
मुंबई (प्रतिनिधी) : शालेय पोषण आहारामध्ये अंगणवाडीतील लहान मुलांना दिला जाणारा वाटाणा आणि भरडा शिजत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात समोर आला आहे. अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी हा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणला. भिजवून ठेवलेला वाटाणाही कुकरमध्ये 9 ते 10 शिट्ट्या देऊन शिजत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

असा निकृष्ट दर्जाचा आहार देणे बंद करा, अशी मागणी रेश्मा पारधी यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे. व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, “अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब, मला खरंच तुम्हाला एक सांगायचं आहे की आमच्या अंगणवाडीत येणारा हा माल खरंच बंद करा. निकृष्ट दर्जाचा माल नको आहे. थोडा द्या, पण चांगला द्या. आमच्या मुलांच्या आहाराच्या बाबतीत तरी त्यांच्याशी असा खेळ खेळू नका.”
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेश्मा पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्यांची पुढील 10 दिवसांत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांनीही या निलंबनावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी निलंबनाची कारवाई केली, त्यांनी आधी हा पोषण आहार खाऊन दाखवावा, असं आव्हान त्यांनी दिलं.
अमोल कोल्हे म्हणाले की, या प्रकरणात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तो हरभरा आणि वाटाणा खाऊन दाखवावा. कुकरमध्ये 11 शिट्ट्या देऊनही वाटाणा शिजत नसेल आणि तुम्ही त्याला पोषण आहार म्हणत असाल, तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या भगिनीने या विरोधात आवाज उठवला आणि तिच्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे ज्यांनी ही कारवाई केली आहे, त्यांनी अगोदर हे अन्न खाऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
पुढे ते म्हणाले की, राज्य पातळीवर ज्या पद्धतीने मुलांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे, अशा लोकांना पाठीशी न घालता त्यांच्यावर पहिल्यांदा कडक कारवाई केली पाहिजे. त्या भगिनीवर निलंबनाची कारवाई करण्यापेक्षा ‘चोर सोडून संन्यासाला फाशी’ देण्याचा प्रकार थांबवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.जर काळजीपोटी या महिलेने हा व्हिडिओ केला असेल, तर त्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. या प्रकरणाकडे केवळ शिस्तपालनाच्या दृष्टिकोनातून पाहून चालणार नाही, असंही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.




