अणदूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू
गगनबावडा - कोल्हापुरात एकीकडे शहराच्या मध्यभागी भरदिवसा बिबट्याने धुमाकूळ घालत थरकाप उडवला, तर दुसरीकडे गगनबावड्याच्या अणदूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका बैलाचा मृत्यू झाला. दोन दिवसांतील या सलग घटनांमुळे कोल्हापुरात बिबट्याचा धोका गंभीर बनला आहे. ताराबाई पार्क परिसरात काल दुपारी बिबट्याने अचानक प्रवेश करताच परिसरात एकच गोंधळ उडाला. बिबट्याने पोलीस, वनकर्मचारी आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकाराने पाहणाऱ्यांची गर्दी जमली, तर बिबट्या जीव वाचवण्यासाठी ‘महावितरण’ च्या आवारातील ड्रेनेज चेंबरमध्ये लपला.

तब्बल तीन तासांच्या रोमांचक कारवाईनंतर वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने बिबट्याला जेरबंद केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी भुलीचे इंजेक्शन देत बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात ठेवले. सध्या त्याला वन्यजीव उपचार केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या हल्ल्यात शाहूपुरी पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा बळवंत पाटील, बाग कर्मचारी तुकाराम खोंदल आणि वन कर्मचारी ओंकार काटकर हे जखमी झाले असून, खोंदल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
दरम्यान, या शहरातील थराराचा धक्का ताजा असतानाच गगनबावड्याच्या कावळटेक धनगरवाड्यावर बिबट्याने शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या बैलावर हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, ट्रॅप कॅमेरातही बिबट्याचे दर्शन झाले आहे. वनरक्षक प्रकाश खाडे, सूर्यकांत गुरव आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी पंचनामा केला. वनविभागाने अणदूर - धुंदवडे मार्गावरील नागरिकांना प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
कोल्हापुरातील या दुहेरी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे.




