अमित शाहांनी राजीनामा द्यावा; अभिजीत दीपकेंची थेट मागणी, अनेक मुद्द्यांवर सरकारवर टीका

अमित शाहांनी राजीनामा द्यावा; अभिजीत दीपकेंची थेट मागणी, अनेक मुद्द्यांवर सरकारवर टीका

मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईसाठी गृहमंत्री जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दीपके यांनी केली.

कॉकरोच जनता पार्टीला परदेशातून निधी मिळत असल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जर अमित शाह गृहमंत्री असताना बाहेरून फंडिंग होत असेल, तर ते त्यांच्या यंत्रणेचं अपयश आहे. मग तुम्ही चाणक्य कसले? त्यामुळे त्यांनीही राजीनामा द्यावा, असे वक्तव्य त्यांनी केले.

याशिवाय, सध्याच्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवरही त्यांनी टीका केली. विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्द्यांवर सरकारची भूमिका चुकीची असल्याचा आरोप करत, Gen Z ला ट्रोल करून काही मिळणार नाही. हीच तरुण पिढी उद्या देशाचं नेतृत्व करणार आहे,असे ते म्हणाले.

दीपके यांनी शेतकरी संघटनांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानत, गरज पडेल तेव्हा शेतकऱ्यांसोबत उभे राहू, असेही स्पष्ट केले. तसेच, भाजपमध्ये प्रवेशासाठी ऑफर आणि धमक्या आल्याचा दावा करत, कितीही ऑफर आल्या तरी मी भाजपमध्ये जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा आधीपासूनच कट होता, असा दावा करत पोलिसांच्या कारवाईवर त्यांनी टीका केली. मात्र, या आरोपांवर संबंधित यंत्रणांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.