अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक विकास कार्यक्रम संपन्न
वाठार (प्रतिनिधी) - श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समधील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभाग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर विभाग आणि एआयसीटीई ट्रेनिंग अँड लर्निंग (अटल) यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन स्वरूपात आयोजित सहा दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आले. इंडस्ट्री ४.० च्या तत्त्वांचा परिचय देणे आणि आधुनिक उत्पादन व्यवस्थापन, औद्योगिक ऑटोमेशन, आयाओटी, स्मार्ट एनर्जी आणि क्रिटीकल इन्फ्रास्ट्रक्चर सायबर सिक्युरिटी सारख्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान प्राध्यापकांपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट होता. कार्यक्रमासाठी देशभरातून २५० प्राध्यापकांचा सहभाग नोंदवला.

कार्यक्रमामध्ये विविध सत्रांमार्फत इंडस्ट्री ४.० च्या तांत्रिक व व्यवस्थापकीय पैलूंवर सखोल चर्चा झाली. यामध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि इंडस्ट्रियल आयओटीचे नवीन ट्रेंड, स्मार्ट सेन्सिंग आणि सेन्सर आधारित तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगचा मॅन्युफॅक्चरिंगमधील उपयोग, कार्बन फुटप्रिंट मॉनिटरिंग सोल्यूशन्स तसेच स्मार्ट एनर्जी आणि ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स या विषयांवर व्यावहारिक मार्गदर्शन देण्यात आले. शिवाय औद्योगिक सायबर सिक्युरिटीबाबत क्रिटीकल इन्फ्रास्ट्रक्चरचे संरक्षण कसे करावे याबाबत शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुरेश मिक्किली (सहयोगी प्राध्यापक व अधिष्ठाता, एनआयटी, गोवा) यांचे इनोवेशन, डेव्हलपमेंट व आयओटी याविषयी तसेच अरिजीत चॅटर्जी (चीफ बिझनेस ऑफिसर, सी- जझेनट्रीक्स) यांनी डिझाईन थिंकिंग व प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ४.० विषयी मार्गदर्शन केले.
राजशेखर उचील (इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑटोमेशन) यांनी स्मार्ट सेंसिंग टेक्नॉलॉजीसचे तंत्र आणि उद्योगातील ट्रेंड मांडले. भास्करन एस. (सिंगापूर) यांनी कार्बन फुटप्रिंट मॉनिटरिंगसाठी स्मार्ट टूल्सवर प्रकाश टाकला. डॉ. जयेश बर्वे (बेंगळुरू) यांनी इंडस्ट्रियल ऑटोमेशन व इंडस्ट्रियल आयओटी संदर्भातील तांत्रिक सत्र घेतले. मोहन पटेल (औद्योगिक तज्ज्ञ व सल्लागार) यांनी औद्योगिक ऑटोमेशनमधील रिसेंट ट्रेन्ड्सवर मार्गदर्शन केले. रोहित कदम (बेळगाव) यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग आधारित क्वालिटी कंट्रोल विषयावर तांत्रिक माहिती दिली. डॉ. दीपक वाईकर (सिंगापूर) यांनी स्मार्ट एनर्जी व ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्सच्या अंमलबजावणीवर चर्चा केली. तसेच संजीव शर्मा (इंडस्ट्रियल सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ) यांनीही क्रिटीकल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सायबर सुरक्षा उपायांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात डॉ. सीमा पाटील (शैक्षणिक अधिष्ठाता, अशोकराव माने इन्स्टिट्यूट) यांनी रोडमॅप फॉर इम्प्लिमेंटिंग इंडस्ट्री ४.० इन इंडियन मॅन्युफॅक्चरिंग हा विषय सविस्तरपणे समजावून सांगितला.
सदर कार्यक्रमाद्वारे प्राध्यापक आणि संशोधकांना केवळ सिद्धांत नव्हे तर प्रत्यक्ष उद्योगाशी निगडित तंत्र, सिस्टीम्स आणि रीयल-टाइम अॅप्लिकेशन्सची सखोल माहिती मिळाली. त्यामुळे अभ्यासक्रमात आधुनिक कौशल्ये समाविष्ट करण्यासाठी शैक्षणिक संस्था सक्षम होतील आणि विद्यार्थी-संशोधकांसाठी उद्योग-प्रगत संशोधन व प्रशिक्षणाच्या दृष्टीने नव्या संधी खुल्या होतील, असा विश्वास महाविद्यालयाच्या संचालक डॉ. सौ. एस. आर. चौगुले यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. एस. एस. पाटील आणि सहसमन्वयक म्हणून इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट समन्वयक डॉ. चेतन डोंगरसाने यांनी काम पाहिले.
कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष विजयसिंह माने व जि. प. माजी सदस्या मनीषा माने यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच कॅम्पस डायरेक्टर प्रा. पी. बी. घेवारी व संचालक डॉ. एस. आर. चौगुले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.




