आता मला खिंड लढू द्या, मी एकटाच मुंबईला येतोय"; सरकारला इशारा देत मनोज जरांगेंची मोठी घोषणा
अंबड (अंतरवाली सराटी): मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची दिशा बदलत एक मोठी घोषणा केली आहे. "आता सगळे नाही, तर मी एकटाच मुंबईला येतोय. आता सरकार कशी परवानगी देत नाही, तेच बघतो," असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी जाण्यावर ते ठाम आहेत.

मराठा समाजाला गाड्यांचे नियोजन तसेच ठेवण्याचे आवाहन
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "पहिला मुद्दा म्हणजे मी एकटाच मुंबईला निघणार आहे. याचा अर्थ असा नाही की समाजाने येऊ नये. परंतु, मराठा समाजाने आंदोलनासाठी ज्या गाड्या बुक केल्या आहेत आणि वर्गणी गोळा केली आहे, ती तशीच ठेवा. त्या वर्गणीतील पैसे सध्या खर्च करू नका. आधी मला मुंबईची वाट सुकर करू द्या, रस्त्यावरील सगळे काटे संपल्यानंतर मी स्वतः तुम्हाला मुंबईत कधी यायचे ते सांगेन."
सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी
गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असूनही राज्य सरकारकडून मागण्यांवर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या जरांगे यांनी आता स्वतः मुंबई गाठून आंदोलनाची खिंड लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन घोषणेमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला आता काय वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




